सांगली : पोलिस कोठडीत अनिकेत कोथळेच्या केलेल्या खूनप्रकरणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह १४ आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने त्यावर १२ डिसेंबरला (मंगळवारी) चर्चा होणार आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाची सर्व माहिती घेऊन सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी सोमवारी नागपूरला रवाना झाले.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सीआयडीकडून अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्याची देशातील पहिली घटना सांगलीत घडली. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती.
सध्या नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पाच आमदारांनी अनिकेतच्या खूनप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. सोमवारी विधानसभेतील कामकाज तहकूब झाल्याने कोणतीही चर्चा झाली नाही. यावर मंगळवारी चर्चा होणार आहे. त्यामुळे सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी हे आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत. आ. गाडगीळ हे औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी चर्चा करणार आहेत.उपोषण मागेअनिकेत कोथळे कुटुंबाने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. अनिकेतचा खून-खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी त्यांनी मागणी केली. आ. गाडगीळ यांनी कोथळे कुटुंबास, या मागण्यांबाबत शासनाशी चर्चा सुरू आहे. नोकरीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याने कोथळे कुटुंबाने उपोषण मागे घेतले.