सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्याकडे नोंद असलेल्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे संशयित होते. हा गुन्हा कबूल करावा म्हणून त्यांना कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली. यात अनिकेतचा मृत्यू झाल्याचे शहर पोलीस ठाण्यात त्यावेळी कार्यरत असलेल्या अंमलदाराने सांगितल्याची साक्ष तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली.सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. मंगळवारी तत्कालीन गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक राजन माने यांची साक्ष सुरू झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासावेळी माने यांची साक्ष नोंदविण्यात आली.अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे पळून गेल्याची देण्यात आलेली फिर्याद खोटी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे व शहर पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अंमलदारांकडे चौकशी केल्यानंतर अनिकेत व अमोल पळून गेले नसून गुन्हा कबूल करण्यासाठी दोघांना मारहाण केली व त्यात अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली येथील महादेवगड येथे नेऊन जाळल्याचे निष्पन्न झाले, असे त्यांनी सांगितले.उलट तपासादरम्यान साक्षीदारांना विचारलेल्या प्रश्नावरून सरकारी पक्ष व बचाव पक्षात युक्तिवाद रंगला. या खटल्याची पुढील सुनावणी आता १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
अनिकेत कोथळे खून खटला:..म्हणून कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली, पोलीस निरीक्षकांची साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 4:12 PM