सांगली : पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे खून-खटल्याची सुनावणी आता १ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी आज, सोमवारपासून सलग तीन दिवस होणार होती. राज्य गुन्हे अन्वेषणच्या सांगली शाखेचे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.
६ नोव्हेंबर २०१७ रोजी चोरीच्या संशयावरून अटक केलेल्या अनिकेत कोथळेला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटातील निर्जनस्थळी नेऊन तिथे जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदींविरोधात न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना स्थितीमुळे सुनावणी स्थगित होती. ती जानेवारीत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अनिकेत कोथळेबरोबरच चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अमोल भंडारे याची महत्त्वपूर्ण साक्ष झाली आहे, तर अनिकेतचा खून झाला त्यावेळी उपअधीक्षकपदी असलेल्या दीपाली काळे यांचीही साक्ष झाली आहे. त्यानंतर पुढील सुनावणी २२ मार्चपासून होणार होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असून सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत.