सांगली : अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी संगनमताने कट रचून केलेला प्री-प्लॅनड् मर्डरच (पूर्वनियोजित खून) आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात केला.
अनिकेत कोथळे याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी आंबोली घाटात नेऊन जाळला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे (वय ४०, रा. स्फूर्ती चौक), हवालदार अनिल श्रीधर लाड (५२, रा. यशवंतनगर), अरुण विजय टोणे (४८, रा. विश्रामबाग), नसरुद्दीन बाबालाल मुल्ला (३०), गाडीचालक राहुल शिवाजी शिंगटे (४१, बालाजीनगर, सर्व रा. सांगली) यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल आहे, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल या पाच पोलिसांसह ११ जण निलंबित आहेत.
अटकेतील झिरो पोलीस झाकीर नबीलाल पट्टेवाले व जीपचालक राहुल शिंगटे यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात बुधवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. सरकार पक्षाला जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, सीआयडीचे मुकुंद कुलकर्णी यांनी मदत केली. बचाव पक्षातर्फे अॅड. दीपक शिंदे, विकास पाटील व किरण शिरगुप्पे यांनी काम पाहिले.निकम त्यांच्या युक्तिवादात म्हणाले, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अमोल भंडारे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह आठ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी अनिकेतला अमानुष मारहाण केल्याचे जबाब दिले आहेत. प्रत्येक संशयिताचा सहभाग त्यातून निष्पन्न होतो. जर संशयितांना जामीन दिल्यास ते साक्षीदारावर दबाव व तपासात अडथळे आणू शकतात. संरक्षकच जर गुन्हेगारी करू लागले, तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागायची?, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.
बचाव पक्षाने कॉल डिटेल्स व कागदपत्रांची मागणी केली. त्यावर निकम म्हणाले की, कॉल डिटेल्स हा तपासाचा भाग आहे. ते डिटेल्स बचाव पक्षाला देण्यास सरकार पक्षाचा विरोध आहे. तसेच कागदपत्र मागणी अर्जाबाबत त्यांनी सहमती दर्शवली. जी कागदपत्रे तपास कामात लागतील, त्याच्या प्रति तपास अधिकाऱ्यांना देण्यास सरकार पक्ष तयार आहे; परंतु तपासाव्यतिरिक्त त्या काळातील स्टेशन डायरी, लॉकअप डायरी अशा स्वरूपाची कागदपत्रे देता येणार नाहीत. तपास कामातील मूळ कागदपत्रे सरकार पक्षाकडेच राहतील, असा युक्तिवाद त्यांनी केला.
बचाव पक्षाच्यावतीने अॅड. दीपक शिंदे म्हणाले की, झाकीर पट्टेवाला हा या गुन्ह्यामध्ये कोठेही सहभागी असल्याचे दिसत नाही. केवळ पोलीस अधिकाºयांच्या सांगण्यावरून बेशुध्द व नग्न अवस्थेतील अनिकेतला कपडे घालण्यास मदत केली, हा काही गुन्हा होऊ शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर आता १८ रोजी निर्णय होणार आहे.