अविनाश बाडआटपाडी : आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. या भाषणाच्या चित्रफितीचे सध्या मतदारसंघात बाबर गटाचे कार्यकर्ते चांगलेच मार्केटिंग करीत आहेत; तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चित्रफितीनंतर, एवढ्या चांगल्या नेत्याला तुम्ही सत्तेत असताना का मंत्री केले नाही, अशीही विचारणा केली जात आहे. आ. पाटील यांचे प्रेम पुतना मावशीचे असल्याचे बोलले जात आहे.विधानसभेच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना आमदार पाटील यांनी आमदार बाबर यांची चांगलीच स्तुती केली. ते म्हणाले, बाबर यांच्यासारखा उत्तम प्रशासक, चिकाटीचा कार्यकर्ता तुमच्या पक्षाला मिळाला आहे. तुमचे सगळे आमदार एका बाजूला उभे करा आणि आमच्या बाबर यांना एका बाजूला उभे करा. चिकाटीचा आणि वसंतदादांच्या तालमीत शिकलेला नेता तुम्ही मंत्रिमंडळात घ्यायला हवा होता.आ. पाटील यांच्या या भूमिकेचे राजकीय जाणकार वेगवेगळे अर्थ काढत आहेत. केवळ ३५ सेकंदाच्या या चित्रफितीने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकारणातील अनेक नेत्यांचे व्यक्तिगत संबंध असतात; पण थेट विधानसभेत आ. पाटील यांनी सत्तारूढ पक्षातील आमदार बाबर यांची बाजू घेतली. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथील कोणत्याच लोकप्रतिनिधीला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. मात्र येथील नेत्यांनी स्वकर्तृत्वावर या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.आ. पाटील यांच्या या भाषणामुळे बाबरप्रेमी खुशीत दिसत आहेत. मात्र त्याचवेळी जेव्हा राष्ट्रवादी -कॉँग्रेसची सत्ता होती, तेव्हा बाबर यांना मंत्रिपदाची संधी देण्यापासून कुणी रोखले होते, की त्यांचे कर्तृत्व आणि महत्त्व ते शिवसेनेत गेल्यावर कळाले? आमदार बाबर टेंभू योजनेच्या पाण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. पण आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात केवळ भाषणबाजीशिवाय व अनुशेषाचे कारण दाखवण्याशिवाय ठोस काय झाले, की केवळ शिवसेनेत असंतोष पसरावा, यासाठी बाबर कर्तृत्ववान असल्याचा साक्षात्कार आमदार पाटील यांना झाला, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
अनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:27 AM
आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले.
ठळक मुद्देअनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चासोशल मीडियावर व्हायरल