आटपाडी : माजी आमदार अनिल बाबर यांना विधानसभेसाठी आम्ही तीनवेळा जिवाचे रान करुन मदत केली. दोनवेळा ते आमदार झाले. ज्यावेळी आम्ही त्यांना मदत केली, तेव्हा गोड वाटले आणि महिन्याभरात अचानक मी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना शत्रू कसा वाटू लागलो? अनिलभाऊंनी वेगळ्या वाटेचा विचार करताना, आमचं काय चुकलं हे एकदा जाहीर करावं, असे आवाहन जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.देशमुख म्हणाले की, अनिलभाऊंच्या विजयासाठी आम्ही अनेकदा प्रामाणिकपणे त्यांना मदत केली आहे. माध्यमांमध्ये त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा आहे. राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर त्यापूर्वी सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी आम्हालाही बोलावून घ्यायला हवे होते. या चर्चेपूर्वी त्यांनी आमचा विचार केला नाही. तीनवेळा मदत करुनही आमच्यावर त्यांची किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी कशासाठी? आम्ही कुठे कमी पडलो असेन, तर त्यांनी आमच्या पदरात आमचे माप टाकावे, अन्यथा भगव्या वादळाच्या चर्चेला ठामपणे नकार देऊन या चर्चेला पूर्णविराम द्यावा. औरंगाबादच्या एकाच कंपनीकडून दोन नेत्यांनी सर्वेक्षण केले आहे. त्या कंपनीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्हीही नेत्यांना एकाला सर्वाधिक मते मिळतील, तर दुसऱ्या नेत्याला पहिल्या क्रमांकाची मते मिळतील, असा अजब निष्कर्ष काढला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ५० हजारांनी मताधिक्य मिळेल, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला होता. पण प्रत्यक्षात पराभव झाला. आताही सर्वेक्षणातून फसवणूक सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही निवडणूक लढविली तर बाबर यांचा पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न करणार काय? असे विचारता ते म्हणाले की, ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले तरी पाठिंबा मागणार नाही. मात्र राष्ट्रवादीत राहिले, तर त्यांचाच काय, मतदार संघातील सर्वत्र नेत्यांचा पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न करेन, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)दोन महिन्यांपर्यंत मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सगळे नेते विशेषत: खानापूर तालुक्यातील सगळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांचा (सदाशिवराव पाटील) काहीही करुन कार्यक्रम करायचाच, असे म्हणत होते. महिन्याभरापासून वेगळीच चर्चा सुरू झालीय. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना नेमका कुणाचा कार्यक्रम करायचा आहे? असा प्रश्न अमरसिंह देशमुख यांनी उपस्थित केला.
अनिलभाऊ आमचं काय चुकलं?
By admin | Published: July 20, 2014 11:36 PM