देवराष्ट्रे : सागरेश्वर अभयारण्यातील वन्यप्राणी अनेक ठिकाणी कुंपण तुटल्यामुळे बाहेर पडत आहेत व शेतातील पिके फस्त करीत आहेत. याबाबत वारंवार सूचना करूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे उद्या, शनिवारी (दि.२२) सागरेश्वर अभयारण्याच्या गेटसमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.सागरेश्वर अभयारण्यास कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, हे कुंपण अनेक ठिकाणी तुटले आहे. या तुटलेल्या ठिकाणांतून बिबट्या, सांबर, हरीण, रानडुकरे, इजाट, लांडगे, कोल्हे, ससे बाहेर पडत आहेत व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. याबाबत वारंवार तोंडी माहिती देऊनही प्रशासनाने तुटलेली कुंपण व अपूर्ण राहिली कुंपण पूर्ण केलेले नाही. यामुळेच सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिनकर माळी, केदार माळी, मधुकर महिंद, नितीन शिंदे, सुरेश माळी, सिंधुताई पाटील, संतोष ढोकळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सागरेश्वरमधील प्राणी कुंपणाबाहेर; ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 6:50 PM