अंकलखोप : अंकलखोप (ता. पलुस) येथील चिंचबनातील म्हसोबा यात्रा दुसऱ्या वर्षीसुध्दा रद्द करण्यात आली असल्याची माहिती सरपंच अनिल विभुते यांनी दिली.
अंकलखोपचे ग्रामदैवत म्हसोबा देवाची यात्रा दि. १८ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात होणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी म्हसोबा यात्रा साजरी करायची की नाही, या विषयावर म्हसोबा देवालयाचे पुजारी, मानकरी व पोलिसांची बैठक बोलविली होती. सध्या गावोगावच्या यात्रा रद्द करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.
अंकलखोप येथील चिंचबनातील म्हसोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या कैकाडी, बेलदार, माकडवाले, खोकडवाले तसेच इतर समाजातील लोकांचे कुलदैवत असल्यामुळे विविध भागांतून भाविक येतात. गावातील काही जण नोकरी व व्यवसायानिमित्त देशाच्या विविध कानाकोपऱ्यात राहतात. तेही यात्रेनिमित्त येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अधिक मदत होईल. यात्राकाळात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. पालखी सोहळ्यालाही गर्दी असते. त्यामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सरपंच विभुते यांनी सांगितले. यात्रा काळात होणारे विविध धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
यावेळी डॉ. जयवर्धन पाटील, उपसरपंच विनय पाटील, सदस्य अशोक चौगुले, सुनील चौगुले, संदीप गुरव उपस्थित होते.
चौकट
म्हसोबा देवालय ३० एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याचे पुजारी संदीप गुरव व सुखदेव गुरव यांनी सांगितले.