सांगली : शिरोळ तालुक्यातील एका १७ वर्षीय तरुणीने अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलावरुन नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सांगलीच्या आयुष हेल्पलाईन टीमने वेळीच धाव घेतल्याने या तरुणीस सुखरूप नदीतून बाहेर काढता आले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून तरुणीने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. अंकली येथे ही तरुणी एकटीच आली होती. तेथून ती चालत नवीन पुलावर गेली. पुलावर चढून तिने थेट नदीत उडी घेतली. हा प्रकार काही वाहनधारकांनी पाहिला. वाहने पुलावर थांबली. तरुणीने उडी घेतल्याची चर्चा सुरु झाली. तेवढ्यात आयुष हेल्पलाईन टीमचे अमोल पाटील नृसिंहवाडीकडे (ता. शिरोळ) निघाले होते. त्यांच्यासोबत टीममधील अन्य सदस्यही होते. या सर्वांनी नदीकडे धाव घेतली. ही तरुणी पाण्यात बुडत होती. मच्छिमारांच्या मदतीने तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तरुणीला नदीतून बाहेर काढल्यानंतर तिची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. तिला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन तिची चौकशी केली. पण तिने कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. तसेच ‘मला का वाचविले’? असा सवाल तिने केला. (प्रतिनिधी)प्रेमप्रकरणातून कृत्यप्रेमप्रकरणातून या तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी त्याअनुषंगाने तिच्याकडे चौकशीही केली. परंतु यासंदर्भात तिने कोणतीही माहिती दिली नाही. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकही दुपारी रुग्णालयात दाखल झाले. प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये, यासाठी नातेवाईकांनी तक्रार दिली नाही.
अंकलीत तरुणीने नदीत उडी घेतली
By admin | Published: April 11, 2017 12:21 AM