सांगली : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसूलीसाठी सावकाराने साथीदाराच्या मदतीने अंकली (ता. मिरज) येथील मंगेश सुकुमार पाटील (वय २७) या तरुणासह त्याच्या कुटूंबावर घरात घुसून हल्ला केला.
‘पैसे नाही दिल्यास जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकीही सावकाराने या कुटूंबास दिली आहे. याप्रकरणी सावकार अभिजीत बाळासाहेब नेजकर (२७, दानोळी) व केतन पाटील (२७, औरवाड, ता. शिरोळ) या दोघांविरुद्ध सोमवारी रात्री सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगेश पाटील अंकलीत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ राहतात. ते शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसाय व कौटूंबिक अडचण निर्माण झाल्याने तीन वर्षापूर्वी त्यांनी अभिजीत नेजकर याच्याकडून प्रतिमहिना दहा टक्के व्याज दराने एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
पाटील प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये व्याज देत होते. व्याज देण्याचे चुकल्यास नेजकर दंडही करीत असे. आतापर्यंत पाटील यांनी व्याजासह सहा लाख रुपयांची परतफेड केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून पाटील यांनी व्याज देण्याचे बंद केले. त्यामुळे नेजकर याने त्यांच्याकडे वसूलीसाठी तगादा लावला होता. पाटील यांनी पैसे देण्यास देत होते. यातून त्यांच्यात वाद सुरु होते.