सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटातील माजी मंत्री अण्णा डांगे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील सभेला हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या नेतृत्वात एकसंध दिसत असलेल्या राष्ट्रवादीत फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.सांगली जिल्ह्यात रविवारी अजित पवारांनी जयंतरावांच्या मूळ गाव असलेल्या कासेगावला भेट दिली. पेठमध्येही त्यांचे स्वागत महायुतीच्या नेत्यांनी केले. यावेळी जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले प्रा. पद्माकर जगदाळेही उपस्थित होते. त्यानंतर कोल्हापुरातील सभेला माजी मंत्री अण्णा डांगे उपस्थित राहिल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. डांगे यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चेला यामुळे सुरुवात झाली आहे.जनसंघ व नंतर भाजपमध्ये दीर्घकाळ राहिलेल्या अण्णा डांगे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करीत जयंत पाटील यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीत आपल्या गुणवत्तेची योग्य दखल घेतली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.
धनगर समाजाच्या प्रश्नासाठी सातत्याने ते काम करीत राहिले. सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी जयंत पाटील यांनी डांगे यांच्याशी असलेले नाते तोडले नव्हते. जिल्हा बँकेत संचालकपदी त्यांचे पुत्र ॲड. चिमण डांगे यांना त्यांनी संधी दिली. अशा परिस्थितीत अण्णा डांगे यांची अजित पवारांच्या सभेला लागलेली हजेरी राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरली आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीत फूट पडणार?जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीत मोठी पडझड झाली नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात पक्षात मोठी फूट पडत असताना सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते एकसंध दिसत आहेत. अशातच अण्णा डांगे यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे जिल्ह्यात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.