प्रताप बडेकर -कासेगावसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव (ता. वाळवा) येथील त्यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारकाच्या स्लॅबला ठिकठिकाणी गळती लागली असून पुतळ्यामागे पावसाचे पाणी साचत आहे. रंग उडालेल्या स्मारकाच्या इमारतीला तडेही जात आहेत. युती शासनाच्या काळात १९९६ मध्ये वाटेगाव येथे लाखो रुपये खर्च करून अण्णाभाऊंचे स्मारक (सांस्कृतिक भवन) बांधण्यात आले. स्मारक बांधल्यापासून आजअखेर प्रशासनाने त्याची रंगरंगोटी केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण स्मारकाचा रंगच बदलून गेला आहे. स्मारकाच्या भिंतीवर ठिकठिकाणी काळसर ठिपके पडले आहेत. येथील शौचालयाची दुरवस्था झाली असून पाण्याचा अपुरा पुरवठा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात व पाठीमागील बाजूस पावसाचे पाणी साचत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्मारकावर असलेल्या पत्र्यांनाही ठिकठिकाणी गंज लागल्याने पाणी गळत आहे.अण्णाभाऊंच्या शिल्पसृष्टीचीही दुरवस्था झाली असून तेथे ग्रामपंचायतीकडून पंधरवड्यातून एकदा साफसफाई केली जाते. या शिल्पसृष्टीजवळच अण्णाभाऊंचे घर असून त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रत्येकवर्षी १८ जुलै या पुण्यतिथीस व १ आॅगस्टला जयंतीवेळी राजकीय मंडळींना अण्णाभाऊंची आठवण येते. या दोन दिवशीच अण्णाभाऊंच्या पुतळ्याची स्वच्छता केली जाते. त्यानंतर वर्षभर या पुतळ्याकडे कोणाचेही लक्ष नसते.सद्य:परिस्थितीतही अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांची परवड सुरू आहे. आजही त्यांच्या स्नुषा श्रीमती सावित्री मधुकर साठे यांना दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जावे लागत आहे. अण्णाभाऊंना चार नाती आहेत. त्यातील दोघींचे लग्न झाले आहे. सुवर्णा साठे ही नात तीन वर्षांपूर्वी सारस्वत बँकेत नोकरीस लागली होती. परंतु चक्कर येऊन पडल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या मणक्याचे हाड मोडले आहे. सध्या त्या घरात असून शस्त्रक्रियेवेळी मणक्याच्या ठिकाणी घातलेले गज काढण्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च आहे. परंतु हे पैसे उपलब्ध होत नसल्याने सुवर्णा घरीच आहेत. पैसे कधी गोळा होणार आणि मुलगी पुन्हा नोकरीवर कधी जाणार, याच चिंतेत सावित्री साठे आहेत. दुसरी नात ज्योती मुंबई नगरपालिकेत दोन महिन्यांपूर्वी शिपाई पदावर रूजू झाल्या आहेत.---सुवर्णा बँकेत कामाला होती, तेव्हा बरे चालले होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून ती घरीच असल्याने कुटुंबाची परवड सुरू आहे. दुसरी मुलगी मागील दोन महिन्यांपासून मुंबई महापालिकेत नोकरीस लागली आहे. सद्य:स्थितीला आर्थिक अडचण भासत असून यासाठी मला दुसऱ्याच्या बांधावर कामाला जावे लागते. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आम्हाला घर बांधून दिले, परंतु ‘बडा घर पोकळ वासा’ अशी आमची स्थिती झाली आहे.
जन्मगावातच अण्णाभाऊंच्या स्मारकाची दुरवस्था...
By admin | Published: July 17, 2014 11:32 PM