इस्लामपूर : सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या शहरातील दारूबंदीच्या ठरावाला मंगळवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव आता उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला जाणार आहे. सभेत शहरामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
पालिका सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. सुरुवातीलाच विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील, सुप्रिया पाटील यांनी दारूबंदीच्या ठरावावर चर्चा घेण्याची मागणी केली. विक्रम पाटील म्हणाले, दारूबंदीचा विषय शहराच्यादृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. दारूमुळे कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सभागृहाने हा ठराव एकमताने मंजूर करावा.
राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे म्हणाले, या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. मात्र हा ठराव केवळ कागदावर न राहता त्याची कठोर अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने शासनाच्या परिपत्रकांचा अभ्यास करून हा ठराव करावा.विश्वास डांगे म्हणाले, उत्पादन शुल्क विभागाने सभागृहाला फक्त शासन निर्णयाची माहिती दिली आहे. नगरपालिका दारूबंदी करू शकते का, यासंबंधी काही मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे कायद्याच्या पातळीवर हा ठराव टिकणे गरजेचे आहे.
शिवसेनेच्या शकील सय्यद यांनी, राष्ट्रवादीकडून ठरावाला पाठिंबा देतानाच दुसरीकडे कायदे पाहून निर्णय घ्या, अशी दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला. त्याला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप नोंदवत, राष्ट्रवादीचा एकमुखी पाठिंबा असल्याचेच स्पष्ट केले.
अमित ओसवाल यांनी, यापुढे शहरामध्ये नव्या दारू दुकानांना ना हरकत दाखला देऊ नका, अशी मागणी केली. शेवटी नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, या विषयाबाबतच्या कायदेशीर बाबींची पडताळणी गेल्या ६ महिन्यांपासून सुरू आहे. यामध्ये नगरपालिकेच्या अधिकार मर्यादा आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊनच हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.
बाबासाहेब सूर्यवंशी यांच्या मागणीनुसार बाजारभाडे वसुली ठेका पध्दतीने देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर रस्ते दुभाजक बसविण्याचे ठरले. उरुणवाडी आणि ताकारी रस्ता परिसरातील नगरपालिकेच्या जागेत ओपन जीम बसविण्याचा निर्णय झाला. संजय कोरे यांनी केलेली, मुलींच्या शाळा व महाविद्यालय परिसरात ओपन जीम करू नका, अशी सूचना सभागृहाने मान्य केली.वर्षभरापूर्वी आयत्या वेळचा विषयआरोग्य समितीचे तत्कालीन सभापती डॉ. संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या २९ सप्टेंबर २०१७ च्या सभेत आयत्यावेळच्या विषयात विकास आघाडीच्या सुप्रिया पाटील यांनी शिवसेनेच्या प्रतिभा शिंदे यांचे अनुमोदन घेत, दारूबंदीचा विषय मांडला होता. त्यावेळी सर्वसाधारण सभेतील चर्चेसाठी या विषयाची शिफारस करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला.