लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांचा तपास त्वरित व्हावा, असे निवेदन ‘अंनिस’तर्फे उपजिल्हाधिकारी विजया यादव यांना देण्यात आले. दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनी विविध उपक्रम राबविण्यात आले.
अंनिसने या निवेदनात म्हटले आहे की, दाभोलकरांच्या खुनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत, तरीही मुख्य सूत्रधार सापडलेले नाहीत. संशयितांना पकडले असले तरी सूत्रधार स्पष्ट झालेले नाहीत. काही संशयितांविरोधात आरोपपत्रही अद्याप दाखल नाही. सूत्रधार शोधेपर्यंत देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकारांच्या अभिव्यक्तीचा धोका संपणार नाही.
हे निवेदन राहुल थोरात, गीता ठाकर, डॉ. सतीश पवार, मुनीर मुल्ला, डॉ. संजय निटवे, अमित ठाकर, अण्णा गेजगे, डॉ. सविता अक्कोळे, धनश्री साळुंखे, चंद्रकांत वंजाळे, संजय गलगले, त्रिशला शहा, संजय गलगले आदींनी दिले.
दरम्यान, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेले जीवनावश्यक साहित्य विविध भागातील पूरग्रस्तांना वाटण्यात आले. सावली निवारा केंद्रातही साहित्य देण्यात आले.