कवठेमहांकाळ : तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत. शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट असताना, शासनाने कोणत्याही प्रकारची बियाणे, खते याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले नाही. शासनाने फेरसर्वेक्षण करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात म्हैसाळ व टेंभू योजनेचे पाणी सोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाझर तलाव, लघुपाटबंधारे तलाव, तसेच अग्रणी नदीवरील बंधारे भरण्यात यावेत. तालुक्यात खरीप हंगाम वाया गेला असल्याने तीव्र चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मागेल त्या ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव, जालिंदर देसाई, माणिक भोसले, उदय शिंदे, भीमसेन भोसले, विजय ओलेकर आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शैक्षणिक शुल्क माफ कराकवठेमहांकाळ तालुक्यात पशुव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लाळ व खुरकत या रोगांच्या लसी त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. दुष्काळी स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. तसेच वीज बिलेही माफ करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कवठेमहांकाळ येथे तालुुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात आप्पासाहेब शिंदे, माणिकराव भोसले आदी सहभागी झाले होते.