सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २९ सप्टेेेंबर रोजी होणार आहे. विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची सभा असल्याने राजकीय टीकाटिपणीने गाजण्याची शक्यता आहे.
विद्यमान संचालक मंडळाची ही सहावी वार्षिक सभा आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचा फायदा या मंडळाला झाला. सर्वाधिक काळ या मंडळाला काम करता आले आहे. गेल्या पाच सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. बऱ्याचदा सभेत राजकीय घडामोडींवर टीकाटिपणी होत असते. टोकाच्या राजकारणाऐवजी विरोधकांना चिमटे काढून उत्तर दिले जाते.
गेल्या काही दिवसांपासून संचालक मंडळात राजकारण सुरू झाले आहे. संस्थांच्या व कारभाराबाबतच्या उघड तक्रारी केल्यामुळे संचालक मंडळात दोन गट आमने-सामने आले आहेत. या सर्व गोष्टींचा उल्लेख शेवटच्या सभेत होऊन राजकीय टीकाटिपणीने सभा गाजण्याची चिन्हे अधिक आहे.
अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बँकेला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सहकारी बँकेला कार्पोरेट लूक देण्याबरोबर आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. अनेक मोठे कारखाने ग्राहक बनविले. बँकेचे अत्याधुनिकीकरण केले. परंतु गेल्या सहा महिन्यात बँकेच्या कारभाराबाबत काहींनी आक्षेप घेतले. यातून पुन्हा राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सभा होत आहे. ही सभा ऑनलाईन आहे. पण संचालक व काही मोजक्या सभासदांना प्रवेश आहे.