सांगली : अंकलखोप (ता. पलूस) जिल्हा परिषद गटाचे भाजपचे सदस्य नितीन नवले यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तोपर्यंत भाजपचे दरीबडची (ता. जत) जिल्हा परिषद गटाचे सदस्य सरदार पाटील काँग्रेसमध्ये जाणार हे निश्चित झाले आहे. शुक्रवारी काँग्रेसची सांगलीत बैठक झाली. या बैठकीस पाटील उपस्थित होते. भाजप नेत्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती.
जिल्ह्यातील भाजप नेते आणि जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, सदस्यांमध्ये कोणताही समन्वय नाही. प्रत्येक नेत्याची वेगळी भूमिका आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या भूमिकेवर भाजप सदस्यच नाराज आहेत. पदाधिकारी बदलावरून भाजपमध्ये सुरू असलेला संघर्षही टोकाला गेल्याचे दिसत आहे. यातूनच भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून आलेले सदस्य भाजपला रामराम ठोकून अन्य पक्षात प्रवेश करू लागले आहेत. मागील आठवड्यात नितीन नवले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तोपर्यंत सरदार पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जत तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक झाली. या बैठकीस सरदार पाटील उपस्थित होते. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले अन्य काही जिल्हा परिषद सदस्यही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.