इस्लामपूर : शिरटे (ता. वाळवा) येथील दोघा खासगी सावकार भावाविरुद्ध आज आणखी एक सावकारीचा नवीन गुन्हा दाखल झाला आहे. दसऱ्या घटनेत त्या दोघांनी साठ हजार रुपयांच्या मोबदल्यात ८७ हजार रुपयांची वसुली करत एक दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली आहे. हे दोघे सावकार पोलिसांच्या ताब्यात आहेत.
याबाबत प्रकाश दादासाहेब डुबल (वय ४०, रा. कोळे, ता. वाळवा) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार हुसेन इस्माईल शेख (वय ३०) आणि मेहबुब इस्माईल शेख (वय ४०, दोघे रा. शिरटे) यांच्याविरुद्ध सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी कि. म. गड येथील शरद जयवंतराव खोत यांनी या दोघांविरुद्ध सावकारीची फिर्याद दिली आहे.
डुबल यांचे कृष्णा कारखान्याच्या परिसरात हद्दीत गॅरेज आहे. मार्च २०१६ मध्ये त्यांनी या सावकारांकडून १५ टक्के व्याजदराने ६० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर डुबल यांनी दोघांना ८७ हजार रुपये परत केले. मात्र या दोघा सावकारांनी संगनमत करून डुबल यांची दुचाकी (क्र. एमएच १० बीई ४५२२) ही जबरदस्तीने ताब्यात घेत वाहन हस्तांतराच्या फॉर्मवर स्वाक्षरी घेतल्या होत्या. त्यानंतर डुबल यांना आमचे पैसे देऊन तुझी दुचाकी घेऊन जा, असे धमकावत होते. तसेच या दुचाकीची परस्पर विक्रीही या सावकारांनी केली होती. पोलीस हवालदार उत्तम माळी अधिक तपास करीत आहेत.