सांगली : शहर विभागाच्या तत्कालीन पोलीस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी सांगितले म्हणूनच अमोल भंडारे याने नंतरचे जबाब बदलले असल्याचा मुद्दा बचाव पक्षाने बुधवारी मांडला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या घटनेतील साक्षीदार अमोल भंडारे याने घटनेत सत्य असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोथळे खून खटला सुनावणी खंडित झाली होती. ती सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घटनेतील प्रत्यक्ष साधीदार आणि अनिकेत कोथळेचा मित्र अमोल भंडारे याची साक्ष नोंदवून घेतली. त्यात त्याने कामटे याने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून डोक्याला रिव्हॉल्व्हर रोखून धमकी दिल्याचेही न्यायालयासमोर सांगितले. मंगळवारी उलटतपासणी करण्यात आली. उलट तपासणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी खुनाच्या घटनाक्रमातील विसंगती न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता.
बुधवारी पुन्हा एकदा उलट तपासणी घेण्यात आली. यात भंडारे याने पहिले दिलेले जबाब सत्य आहेत. मात्र, शहर विभागाच्या तत्कालीन पोलीस उपाधीक्षक काळे यांच्या सांगण्यावरून नंतरचे जबाब बदलण्यात आल्याचा बचाव करण्यात आला. मात्र, भंडारे याने घडलेल्या सर्व घटना या खऱ्या असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. उलट तपासणीदरम्यान सरकारी पक्ष व बचाव पक्षात शाब्दिक चकमकही झाली.
ॲड. गिरीश तपकिरे आणि ॲड. सी. डी. माने यांनी बुधवारी उलट तपासणी केली. बुधवारी भंडारे याची उलट तपासणी पूर्ण झाली आहे.
चौकट
पुढील सुनावणी फेब्रुवारीत
कोरोनामुळे खंडित झालेली अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सोमवारी सुरू झाल्यानंतर सलग तीन दिवस प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या भंडारे याची साक्ष व उलट तपासणी पूर्ण झाली. आता या खटल्याची पुढील सुनावणी २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.