सांगली : प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मे व जून महिन्यांसाठी प्रतिलाभार्थी दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी ही माहिती दिली.
याद्वारे शिधापत्रिकाधारकांना दोन कोटी ३१ लाख १२ हजार ५२ रुपये किमतीचे धान्य मिळणार आहे. अंत्योदयमधील ३१ हजार ३२८ शिधापत्रिका व प्राधान्यमधील ३ लाख ७ हजार ७९ अशा एकूण ४ लाख ६ हजार ४०७ शिधापत्रिकांना लाभ मिळेल. लाभार्थी संख्या १८ लाख ४७ हजार ४८० इतकी आहे. तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना एकूण ३५ किलो धान्य मिळेल. यामध्ये २५ किलो गहू व १० किलो तांदूळ मिळेल. १८ मेपर्यंत ४ हजार १०३ मेट्रिक टन गहू व २ हजार ५९४ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आला आहे. १ हजार ३१ रास्त भाव दुकानांमध्ये मोफतचे धान्य पोहोच झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ७० हजार ८९५ शिधापत्रिकांना धान्य वाटपही झाले आहे. शिल्लक असलेली तूरडाळ, हरभरा डाळ व हरभऱ्याचेही वाटप केले जाणार आहे. उपलब्धतेनुसार साखरदेखील प्रतिकिलो २० रुपयांनुसार मिळणार आहे.