लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रात सर्वात मोठे बदल झाले. इंटरनेटच्या काळात जग जवळ आल्याचा खरा अनुभव उद्योजकांनी या काळात घेतला. कच्च्या मालासाठी चीनवरील अवलंबित्वही कमी झाले. आयात, निर्यातीसाठी इतर देशांचे पर्यायही खुले झाले. दुसरीकडे किरकोळ दुकानदारांपासून ते होलसेल व्यापाऱ्यांपर्यंत साऱ्यांनीच ऑनलाईन व्यवहारावर भर देत डिजिटल विश्वाशी नवे नाते जोडले आहे.
जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला कोरोनामुळे मध्यंतरी फटका बसला, तरी त्यातून अनेक नव्या गोष्टींनाही चालना मिळाली. पूर्वी उद्योजकांसमोर काही मोजकेच पर्याय असत. पण आता कोरोनामुळे संपूर्ण विश्वच त्यांच्यासाठी खुले झाले आहे. चीनमधून सर्वाधिक कच्च्या मालाची आयात-निर्यात होत होती. त्यापुढे जाऊन उद्योजकांनीही कधी विचार केला नव्हता. पण आता ऑनलाईन व्यवस्थेमुळे ऑस्ट्रेलिया, युगांडापासून अनेक देशांशी व्यवहार वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर उद्योगधंदे रुळावर येऊ लागले आहेत. आता सांगलीतच बसून विविध देशांतील कंपन्यांशी थेट संपर्क होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात तयार होणाऱ्या विविध मालाची निर्यातही वाढली आहे.
उद्योग क्षेत्राबरोबरच व्यापार क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. विशेषत: ऑनलाईन व्यवहाराची सवय व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही लागली आहे. पूर्वी रोख व्यवहारावर व्यापाऱ्यांचा भर असे. पण आता ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था बहुतांश सर्वच दुकानात करण्यात आली आहे. जवळपास ६५ टक्के व्यवहार ऑनलाईन होत आहेत. शिवाय बाहेरील व्यापाऱ्यांशीही ऑनलाईनच व्यवहारावर भर दिला जात आहे. व्यापारी लोक कुटुंबासाठी अधिक वेळ देऊ लागले आहेत. हा एक मोठा बदल म्हणावा लागेल.