सांगली : मोबाईलवरील लोन ॲपच्या माध्यमातून तसेच विविध ऑनलाईन साईटवरून ऑनलाईन सावकारीचे प्रकार कोणाच्या निदर्शनास आल्यास किंवा कोणाची फसवणूक झाल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिसांमार्फत केले आहे.
ऑनलाईन सावकारीने सांगली जिल्ह्यातही जाळे फेकण्यास सुरू केले आहे. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल पोलिसांनी घेतली असून अशाप्रकारचा कोणाला अनुभव आला किंवा फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, अशा प्रकारच्या टोळ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे. त्याचबरोबर नागरिकांनी असे ॲप व ऑनलाईन कर्जपुरवठादारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांनी यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाने आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या लाखो कुटुंबांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना भिकेकंगाल करण्यासाठी लुटारूंनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सावकारीचा नवा फंडा शोधला आहे. सावकारीचा आधुनिक प्रकार आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून समोर आला आहे. ''''तुम्ही आर्थिक संकटात आहात, तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय जलद कर्ज हवे आहे का'''' अशा वाक्यांचा भडीमार करून हे रॅकेट गरजू लोकांना जाळ्यात ओढत आहे. सुरुवातीला कमी व्याजाचे आमिष दाखवून नंतर खासगी सावकारीप्रमाणे वसुली करण्यात येते.