सांगली : जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कंपनीकडून ग्राहकांना विविध प्रकारची माहिती एसएमएसद्वारे दिली जात असल्याने मोबाईल क्रमांक आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य, अैाद्योगिक व कृषी गटातील ८ लाख २३ हजार ८४ ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदवला आहे. वीजपुरवठा, बिलिंग व अन्य माहिती त्यांना एसएमएसद्वारे नियमित दिली जाते. मीटरचे रिडींग, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस, देखभाल व दुरुस्ती आदींचीही माहिती दिली जाते. मोबाईल नोंदणी न केलेल्या ग्राहकांपर्यंत माहिती पोहचत नाही. त्यामुळे सर्वांनी मोबाईल क्रमांक नोंदवावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
७६ हजार ५६१ ग्राहकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. यामध्ये ३९ हजार ४५३ घरगुती व ३७ हजार १०८ शेतकरी ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर, १९१२ या कॉल सेंटरवर किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर नोंदणी करता येईल.
चौकट
भाडेकरुंचे मोबाईल क्रमांक द्यावेत
अनेक घरमालकांनी भाडेकरुंसाठी स्वतंत्र मीटर घेतली आहेत. त्यासाठी मोबाईल क्रमांक मात्र भाडेकरुंचा न देता स्वत:चा नोंदवला आहे. वीज वापरणाऱ्या भाडेकरुला त्यासंदर्भात कोणतीही माहिती महावितरणकडून मिळत नाही. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरुचा मोबाईल क्रमांक देण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.