सांगली : शासनाकडून सुरू असलेल्या जिल्हा बँकेच्या चौकशीविरोधात शासनाकडे अपील करण्याचा निर्णय बँकेच्या विद्यमान पदाधिकारी व काही संचालकांनी घेतला आहे. याबाबत बॅँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांच्यासह काही संचालक लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकारी मंत्र्यांना भेटणार आहेत. दरम्यान, चौकशी समितीने फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील मागील संचालक मंडळात झालेल्या व्यवहारांची शासनाने चौकशी सुरू केली आहे. यासाठी पाच लेखापरीक्षकांचे पथक नेमण्यात आले असून, हे पथक गेल्या पंधरा दिवसांपासून बॅँकेच्या प्रधान कार्यालयात कसून चाैकशी करत आहे. तक्रारीवरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बॅँकेच्या चौकशीचे आदेश दिले होते. नंतर तत्कालीन काही संचालकांनी अपील केल्याने आघाडी सरकारनेच ही चौकशी स्थगित केली होती. आता पुन्हा भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीवरून सरकारने चौकशी सुरु केली आहे.भाजपचे संचालक चौकशीविरोधातजिल्हा बॅँकेची चौकशी लावण्यामागे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत; पण या चौकशीवरून भाजपमध्येच मतभेद आहेत. मागील संचालक मंडळाच्या काळात तत्कालीन भाजपचे संचालक व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खा. संजयकाका पाटील यांच्यासह माजी संचालक राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे आमदार व शिंदे गटाचे नेते आ. अनिल बाबर यांच्या संस्थांनाही जिल्हा बॅँकेने कर्जपुरवठा केला असून, संबधित संस्थांची थकबाकी आहे. चौकशीतून काही आक्षेप नोंदले गेले, तर भाजपचे लोकही अडकणार आहे. त्यामुळे भाजपच्या संचालकांनीही पडद्याआड या चौकशीस विरोध दर्शविला आहे.
चौकशीविरोधात सांगली जिल्हा बँकेकडून अपील शक्य, अध्यक्षांसह संचालकांच्या हालचाली सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 5:34 PM