सांगलीत सेवाभावी संस्थांशी संवाद उपक्रमात दिनेश कुडचे यांना मंदार बन्ने यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी प्रशांत आगवेकर, स्नेहल गौंडाजे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वयंसेवी संस्थांनी ‘रोटरी’सोबत संघटितपणे काम केल्यास प्रभावी प्रकल्प राबविता येतील, त्यातून समाजाचा मोठा फायदा होईल, असा सूर स्वयंसेवी संस्थांच्या ऑनलाइन बैठकीत व्यक्त झाला. रोटरी क्लब व स्नेहजित प्रतिष्ठानने बैठकीचे आयोजन केले होते.
प्रारंभी ‘रोटरी’चे संस्थापक पाॅल हॅरीस यांच्या प्रतिमेचे पूजन सन्मती गौंडाजे यांनी केले. ‘रोटरी’चे अध्यक्ष मंदार बन्ने यांनी स्वागत केले. स्नेहल गौंडाजे यांनी स्वयंसेवी संस्थांच्या संघटनासाठीच्या प्रयत्नांची माहिती दिली. असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा यांनी ‘रोटरी’च्या जगभरातील उपक्रमांची माहिती दिली.
सायबर तज्ञ दिनेश कुडचे यांनी स्वयंसेवी संस्थांनी सायबर गुन्ह्यांसंदर्भात घ्यावयाची काळजी, फेसबुक, व्हाॅट्सॲप विषयी बंधने, संस्थांची संकेतस्थळे यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली. इस्लामपूर येथील सचिन खराडे यांनी स्वयंसेवी संस्थांसाठी बनविलेल्या सॉफ्टवेअरची माहिती दिली. नेत्ररोगतज्ज्ञ सुहास जोशी यांनी त्वचा बँकेची माहिती देऊन नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्याचे आवाहन केले.
किशोर लुल्ला, प्रशांत माने यांनी कोरोना काळात रोटरीने सुमारे वीस लाखांची कामे केल्याचे सांगितले. रणधीर पटवर्धन, प्रशांत आगवेकर, प्रमोद चौगुले, स्मिता शेळके, उमेश बामणे, युवराज मगदूम, सुनीता बने, अमोल पाटील, सुधा कुलकर्णी, मीनाक्षी कोळी, नीलिमा कदम, अर्चना पाटील, डॉ. भालचंद्र साठ्ये, मयूर राऊत, दत्तात्रय लोकरे आदींनी बैठकीत भाग घेतला.