सांगली : वाहतूक शाखा सांगलीच्यावतीने विविध कारवायांवेळी जप्त केलेली वाहने वाहनधारकांनी परत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनधारक आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपली वाहने घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे दंड झालेली अथवा जप्त केलेली वाहने मूळ मालकांनी ताब्यात घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------
बँकांमधील गर्दी पुन्हा वाढू लागली
सांगली : कोरोना निर्बंधांमुळे पन्नास टक्के क्षमतेत सुरू असलेले बँक कामकाज आता पूर्ववत करण्यात आल्याने ग्राहकांची बँकांमध्ये गर्दी वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना निर्बंध लागू केले होते. त्यात बँकांमध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये कामकाजास परवानगी होती. आता निर्बंध शिथिल करताना पूर्ण कामकाज सुरू झाल्याने गर्दी वाढत असून अनेक बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला आहे.
----------
सह्याद्रीनगर परिसरातील पथदिवे बंद
सांगली : शहरातील अध्यक्ष बंगला ते मंगळवार बाजार चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. या मार्गावरून कुपवाडकडे अवजड वाहनांची वाहतूक नेहमीच सुरू असते. त्यामुळे पथदिवे बंद असल्याने रस्त्यावरील वाहनांचा व पादचाऱ्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे महापालिकेने या मार्गावरील सर्व पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
-----
वाहतूक पोलिसांकडून कडक तपासणी
सांगली : निर्बंधात शिथिलता देण्यात आल्यानंतर शहरातील गर्दीमध्ये पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. मास्कचा वापर न करणे यासह ट्रीपल सीट फिरणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, यापुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----
औद्योगिक वसाहतीत रस्त्यांची दुरवस्था
सांगली : शहरात माधवनगर रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या परिसरात अनेक कारखाने असल्याने मालवाहतूक वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असते. शिवाय याच परिसरात आरटीओ कार्यालयही असल्याने गर्दी कायम असते. त्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. सध्या पाणी साचून राहिल्याने अपघात घडत असून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.