शिराळा : शिराळा न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नाही, तसेच हा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातून त्यांचे नाव वगळावे असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे २००८ मध्ये मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांना अटक झाली म्हणून आंदोलन केले होते. या आंदोलनाचा खटला शिराळा येथील न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचे नाव या खटल्यातून वगळावे असा अर्ज प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती प्रीती श्रीराम यांनी फेटाळला होता. याबाबत इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ही फेटाळला आहे.या आरोपींना हजर राहता येत नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचा आदेश दिला होता. प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती प्रीती अ. श्रीराम यांनी वारंवार हे दोघे न्यायालयासमोर गैरहजर आहेत असे आदेशात नमूद करून राज ठाकरे व शिरीष पारकर या दोघांचे विरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश काढला होता. शिराळा न्यायालयात २१ एप्रिलला या खटल्याची सुनावणी आहे. आता उच्च न्यायालयात राज ठाकरे यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
शेडगेवाडी येथे राज ठाकरे यांना अटक केल्याबद्दल बंद पाळण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी याबाबत चुकीच्या पद्धतीने हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राज ठाकरे यांचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग नाही त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.. - तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष, मनसे