सांगली : एमबीबीएस पदवीधारकांसाठी विविध विषयातील पदव्युत्तर एम. डी., एम. एस., डी. एन. बी. आणि पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेससाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट पीजी’च्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ६ मे २०२४ पर्यंत अर्जाची मुदत असून २३ जून रोजी परीक्षा होणार आहे.
देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना २६ मे ते ३ जून या कालावधीत अर्जातील त्रुटी असल्यास त्यात बदल करता येईल. १७ जून २०२४ रोजी प्रवेशपत्र उपलब्ध केली जातील.
परीक्षेचा निकाल १५ जुलै २०२४ रोजी घोषित होणार आहे. एमबीबीएस बरोबरच आयुष कोर्सेससाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी आखिल भारतीय पदव्युत्तर आयुष प्रवेश प्रक्रिया म्हणजेच एआयएपीजीईटी या परीक्षेचे वेळापत्रकही घोषित झाले असून पदव्युत्तर आयुष कोर्सेससाठी १५ मे रोजी रात्री ११:५० पर्यंत विद्यार्थांना अर्ज करता येतील. १७ मे ते १९ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी मिळेल. २ जुलै २०२४ रोजी प्रवेश पत्र उपलब्ध केली जातील. आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी या शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा दि. ६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
आयुषची परीक्षा ९७ केंद्रांवरआयुष कोर्सेससाठीची परीक्षा देशभरातील ९७ शहरातील वेगवेगळ्या केंद्रावर ६ जुलै रोजी घेतली जाणार आहे. आयुष कोर्सेसनंतर ३० जून २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.
नीट-पीजीची परीक्षा देशभरातील २५९ केंद्रावर एकाच दिवशी व एकाचवेळी २२ जूनला होणार आहे. एमबीबीएस नंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. एमबीबीएस नंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. देशपातळीवरील तसेच राज्यपातळीवरील सर्व पदव्युत्तर जागांवरील प्रवेश हे या प्रवेश परीक्षेच्या गुणांवरच होतात. त्यामुळे या परीक्षेला अत्यंत महत्त्व आहे.
- डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली