सांगली , दि. २६ : राज्यातील अनेक जिल्हा बँका व खासगी बँकांना शासनाने यापूर्वीच अपलोड केलेले बहुतांश कर्जमाफीचे अर्ज अनसक्सेसचा शिक्का मारून पुन्हा अपलोडसाठी पाठविले आहेत.
सांगली जिल्हा बँकेसह राज्यातील अनेक जिल्हा बँकांमधील अर्ज अपलोडची ही तिसरी फेरी सुरू झाली आहे. म्हणजेच शासन आणि बँक या मार्गावर कर्जमाफीच्या अर्जांच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात एकूण १ लाख ८६ हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. वैयक्तिक अर्जांची छाननी प्रक्रिया अजून सुरू आहे. आचारसंहितेमुळे २५४ गावांमधील कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया यापूर्वीच रेंगाळली होती. या गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे एकूणच प्रक्रियेतील गोंधळ दिसून येत आहे. यातच आता तांत्रिक चुकांचे चक्र थांबण्यास तयार नाही.
सुरुवातीला अपलोड केलेले लाखो अर्ज शासनाकडून रिजेक्ट व अनसक्सेस होऊन बँकांकडे परतले. ते अपलोड केल्यानंतर पुन्हा यातील बहुतांश अर्जांची बँकांकडे परत पाठवणी झाली आहे. बुधवारी सांगली जिल्हा बँकेकडे असे अनेक अर्ज परत आले आहेत.
अर्जांच्या वाऱ्यामधूनही शासनरुपी देव प्रसन्न होत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. भाबडेपणाने त्या यंत्रणांमध्ये सुरू असलेला गोंधळ ते पहात असल्याचे चित्र आहे. अर्जांच्या या वाºया संपणार तरी कधी, असा प्रश्नही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. आधार क्रमांक, कर्जाची व थकबाकीची माहिती यामध्येही तांत्रिक दोष निर्माण झाले असून त्यांचाही तपास आणि दुरुस्ती सुरू आहे.