सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मोठ्या चुरशीने ५८ उमेदवारांनी ७५ अर्ज दाखल केले. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मंगळवारी (दि. २९ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी काेण बंडखोर अर्ज दाखल करणार, याविषयी उत्सुकता आहे.सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत वसुबारसच्या मुहूर्तावर काही अपवाद वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पलूस-कडेगावमधून काँग्रेसकडून डॉ. विश्वजीत कदम, सांगलीतून जयश्रीताई पाटील, मिरजमधून उद्धवसेनेतून तानाजी सातपुते, कॉंग्रेसचे मोहन वनखंडे आणि त्यांचा मुलगा सागर वनखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरमधून माजी आमदार सदाशिवराव पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील, तासगाव-कवठेमहांकाळमधून आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय पाटील आणि त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील, जतमधून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, शिराळ्यातून सत्यजीत देशमुख आदी प्रमुख उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल केले.
बंडखोरांच्या अर्जाची उत्सुकता..खानापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगली भाजपतील पप्पू डोंगरे व तम्मनगौडा रवी-पाटील हे आज मंगळवारी बंडखोरी करत अर्ज भरणार का याची उत्सुकता आहे. तसेच, सांगलीतून कॉंग्रेसचे पृथ्वीराज पाटील, शिराळ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
इच्छुकांचे ७५ अर्ज दाखलविधानसभा मतदारसंघनिहाय - अर्ज संख्या
- मिरज - १४
- सांगली - १०
- इस्लामपूर - ०२
- शिराळा - १०
- खानापूर - १०
- जत - ७
- पलूस-कडेगाव - १०
- तासगाव-कवठेमहांकाळ - १२