सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी शेतकर्यांनी केली. तसे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून जातो. त्यासाठी अनेक एकर शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचे मुल्यांकन चुकीचे झाल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यांतील काही शेतकर्यांनी जमिनींचा मोबदला अद्याप स्वीकारलेला नाही. काहींनी सशर्त स्वीकारला आहे, तर काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे.ही कोंडी फुटण्यासाठी लवाद नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे. सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकार्यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यासंदर्भात महेश सलगरे, रवींद्र पाटील, महादेव कौलापुरे, प्रमोद कबाडे, सचिन पाटील, अरविंद गुळवणे यांच्यासह शंभरावर शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शेतीचे मुल्यांकन करताना अधिकार्यांनी शेतकर्यांना विश्वासात घेतले नाही.
मोबदल्याचा निवाडा एकतर्फी केला. जमिनींचे बाजारमुल्य मनमानीपणाने निश्चित केले. भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा विचार न करता मोघम किंमती निश्चित केल्या. त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याविषयी दाद मागण्यासाठी लवादाची नियुक्ती तातडीने होणे गरजेचे आहे. भूसंपादन होऊन दोन-तीन वर्षे झाली तरी तो अद्याप नेमला गेला नाही. शेतकर्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी स्वीकारले.