जत : कुंभारी (ता. जत) येथील गावकामगार पोलीसपाटील पदावर नियुक्तीसाठी रवींद्र गणपती जाधव यांनी खोटी व बनावट कागदपत्र सादर केली होती. शासकीय चौकशीत हे उघड झाल्याने २८ फेब्रुवारी २०२१ पासून त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला आहे. यासंदर्भात कुंभारी येथील सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब तातोबा शिंदे यांनी अपील दाखल केले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र जाधव यांची २६ मे २०१६ रोजी पोलीसपाटील पदावर नेमणूक झाली होती. नेमणूक करताना त्यांनी कुंभारी येथे राहत असल्याचा दाखला घेतला होता. परंतु प्रत्याक्षात ते जत शहरातील विद्यानगर येथे राहतात. त्यांच्या विरोधात जत न्यायालयात गुन्हा व तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल असताना दिशाभूल करून तहसीलदार जत यांच्याकडून कोणताही गुन्हा व तक्रार दाखल नाही असे बनावट क्रिमिलियर दाखलाही त्यांनी मिळवला होता.
याशिवाय इतर काही किरकोळ स्वरूपात त्यांच्या विरोधात तहसील कार्यालय येथे तक्रारी होत्या. परंतु पोलीसपाटील पदासाठी अर्ज करताना ही माहिती त्यांनी लपवून ठेवली होती. या व इतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून रवींद्र जाधव यांची नियुक्ती रद्द करावी अशी तक्रार काकासाहेब शिंदे यांनी २० जानेवारी २०२० रोज प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे केली होती. मागील दोन वर्षे यासंदर्भात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन रवींद्र जाधव यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.