सांगली : महापालिकेच्या खुल्या भूखंडाची सर्रास विक्री होत आहे. नुकतेच नेमीनाथनगरमधील भूखंड परस्परच विकल्याचे प्रकरण उजेडात आले. त्याची दखल घेत आता खुल्या भूखंडाचा शोध घेऊन त्यावर महापालिकेचे नाव लावण्यासाठी सेवानिवृत्त तहसीलदार; अथवा नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्याला हिरवा कंदील दाखविला आहे.
नेमीनाथनगर येथील महापालिकेचा खुला भूखंड मूळ मालकाने परस्परच विकला. त्यावर खरेदीदाराने दीड कोटी रुपयांचे कर्ज काढले. हे कर्ज थकल्याने जागेचा लिलाव निघाला. लिलावानंतर महापालिका खडबडून जागी झाली. महापालिकेने २०११ मध्येच नगर भूमापन कार्यालयाला पत्र पाठवून या भूखंडावर महापालिकेचे नाव लावण्याचा प्रस्ताव दिला होता; पण दहा वर्षांत हा अर्ज धूळखात पडल्याने या भूखंडाचा बाजार झाला.
याबाबत कापडणीस म्हणाले की, नेमीनाथनगर येथील भूखंडाला महापालिकेचे नाव लावण्याबाबत भूमापन कार्यालयाला पुन्हा पत्र दिले आहे. खुला भूखंड अशी रेकाॅर्डला नोंद आहे. सातबारावर ‘शेतीकडे’ असा उल्लेख आहे. महापालिकेचे एक हजारहून अधिक खुले भूखंड आहेत. त्याचा शोध घेऊन त्यावर नाव लावण्यासाठी नायब तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची लवकरच नियुक्ती करणार आहोत. याशिवाय खुले भूखंड विक्रीचे प्रकार घडत असल्याने त्या जागेवर महापालिकेचा फलक लावण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले.