इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या २०२१-२२ च्या २ लाख ५२ हजार रुपये शिल्लक दाखविणाऱ्या १८९ कोटी ४१ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास विशेष सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्ती सूचना स्वीकारून हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचे नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांनी जाहीर केले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर येथील राजारामबापू नाट्यगृहात नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी निशिकांत भाेसले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत विशेष अर्थसंकल्पीय सभा झाली. लेखापाल विजय टेके यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे दिली.
तीन तास चाललेल्या या सभेत विकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अनेक दुरुस्त्या सुचविल्या. ज्येष्ठ नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी कोविडची परिस्थिती पाहता नागरिकांची लूट थांबविण्यासाठी नगरपालिकेने एक रुग्णवाहिका घ्यावी, अशी मागणी केली. ती मान्य करण्यात आली. गेल्या १६ वर्षांपासून पाणीपट्टीमध्ये वाढ न झाल्याने पाणी योजनेचे व्यवस्थापन करताना आर्थिक ताण पडत असल्याने प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये दरवाढ सुचविली होती. मात्र सर्व सदस्यांनी त्याला विरोध केला.
विश्वनाथ डांगे यांनी बँक शिलकेमध्ये तफावत का आहे, १५२ हेडवर जमा आणि खर्च काहीच नाही यासह अनेक विभागांच्या तरतुदी वाढविण्याची सूचना केली. शहाजी पाटील यांनी शहराचा विकास उलट्या दिशेने सुरू आहे, हे दाखविणारा हा अर्थसंकल्प असण्याची टीका केली. महिलांसाठी स्वच्छतागृह, शिक्षण क्षेत्रातील प्रेरणा अभियान, इस्लामपूर महोत्सव, प्राथमिक मुलांना प्रोत्साहन आणि सर्व प्रकारचे पुरस्कार गुंडाळून टाकण्यात आल्याचा आरोप केला.
विक्रम पाटील यांनी शहराच्या विकासाची गती वाढविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट केले. घरपट्टी, हस्तांतरण कर यामध्ये नागरिकांना दिलासा दिला आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश मिळवून देतानाच कोणतीही करवाढ नसलेला शहराचा हा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प आहे.
नगराध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या टीकेला उत्तर देताना २०११ पासूनच्या अर्थसंकल्पात अडगळीत पडलेल्या भुयारी गटार योजना, डॉ. आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे दलित योजना, सुधारित पाणी योजना, संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे, सौरऊर्जा प्रकल्प, प्रधानमंत्री व रमाई आवास योजना या सभागृहाच्या कारकिर्दीत कार्यान्वित करण्यात आल्याचा आनंद असल्याचे स्पष्ट केले.