लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवेखेड येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे नवे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेत येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
कारखाना कार्यस्थळावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपसभापती नेताजीराव पाटील आणि नवेखेडचे सरपंच प्रदीप चव्हाण उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, सध्या नवेखेड येथे आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. मात्र वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून तेथे आता ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यास आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. तेथील सर्व सुविधा, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका पदांमध्ये नव्याने वाढ करण्यात येईल. त्यामुळे वाळवा येथील आरोग्य केंद्र नवेखेड येथे स्थलांतरित करून त्याचा दर्जासुद्धा वाढवला जाणार आहे. नवेखेडलगतच्या गावांनी या आरोग्य केंद्रास मान्यता दिली आहे. त्यामुळे तेथे आता जागा उपलब्ध करून नव्या इमारतीची उभारणी केली जाणार आहे. या केंद्रातून लगतच्या गावांतील रुग्णांना जलदगतीने आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचा ग्रामस्थांना लाभ होईल.
यावेळी कारखान्याचे संचालक डी. बी. पाटील, उपसरपंच प्रकाश चव्हाण, नेताजी चव्हाण, महालिंग जंगम, बालाजी निकम, संताजी गावडे, सुभाष पाटील, सागर चव्हाण, प्रतीक पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यात मॉडेल शाळा..!
जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यावर यापुढे शासन भर देणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २५ शाळा निवडल्या जाणार आहेत. तेथे शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील. तसेच शाळा परिसर विकसित केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यावर भर असेल.