लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ, ताकारी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास मुंबई येथे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दोन्ही जिल्ह्यातील २८८ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे, अशी माहिती खा. संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील पत्रकार परिषदेमध्ये सोमवारी दिली.ते म्हणाले की, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळअंतर्गत आहे. प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा योजना आहेत. या योजनेद्वारे एकूण ४ टप्प्यांमध्ये ९.३४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांतील एकूण २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे एकूण ६ टप्प्यांमध्ये १७.४४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील एकूण ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. दोन्ही योजना समाविष्ट असलेल्या कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून एकूण १ लाख ९ हजार १२७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या योजनांचे काम अखेर मार्गी लागणार असून, शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होणार असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले. जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणीप्रश्नही यामुळे कायमचा निकालात निघणार असून, तुबची-बबलेश्वर योजना मार्गी लागणार आहे. गेली सहा महिने आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे यासाठी पाठपुरावा करीत होतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या कामात आपण सांगितल्यावर लक्ष घालून हा प्रश्न अखेर सोडवला आहे. त्यामुळे फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे तारणहार आहे. तबब्ल २५ बैठका या प्रश्नावर आपण घेण्यास भाग पाडले व हा प्रश्न अखेर निकालात काढला आहे, असे सांगून, जून २०१९ पर्यंत या योजना पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी जाईल आणि बळीराजा कायमचा सुखी होईल, असे खा. पाटील म्हणाले.१४ वर्षांनंतर प्रश्न निकालातराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या या पाणीप्रश्नाला प्राधान्य दिल्यानेच १४ वर्षांनंतर हा प्रश्न निकालात निघाल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. दुष्काळी भागातील बळिराजाची व भूमातेची तहान कायमची भागविणे हे माझे ध्येय होते. ते आज पूर्णत्वाकडे जात आहे, याचा आपल्याला आनंद होत असल्याचेही खा. पाटील यांनी यावेळी सांगितले.
‘म्हैसाळ, ताकारी’च्या सुधारित खर्चास मंजुरी
By admin | Published: July 04, 2017 12:36 AM