फोटो ओळ : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करण्याबाबतचे पत्र आमदार अनिल बाबर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सांगली जिल्ह्यातील खानापूर हे शहर खानापूर, आटपाडी, जत व तासगाव या तालुक्यांच्या मध्यभागी आहे. या शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने तसेच मुबलक जमीन व पाणी येथे उपलब्ध आहे. त्यामुळे या सर्व भौगोलिक स्थितीचा विचार करून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच मंजूर करावे, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र आमदार बाबर यांनी मंत्र्यांना सुपुर्द केले.
आमदार बाबर म्हणाले, पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथे जावे लागत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील मुख्यत्वे अवर्षणप्रवण भागातील विद्यार्थ्यांना हे आर्थिक दृष्ट्या गैरसोयीचे होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलने खानापूर येथे उपकेंद्र होण्याबाबतचा ठराव करून सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. परंतु शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र बस्तवडे (ता. तासगाव) येथे करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असल्याचे समजते. मात्र, या ठिकाणची जागा विद्यापीठ उपकेंद्रासाठी अयोग्य असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे खानापूर परिसरातील नागरिकांतून असंतोष निर्माण झालेला आहे. तरी सर्व कागदपत्रांचे अवलोकन करून सदर निर्णयाचा फेरविचार व्हावा व शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे करण्यास मंजुरी मिळावी त्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी केली.