कडेगाव : कडेगाव नगर पंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रभाग क्रमांक १७मधील भाजपचे नगरसेवक नितीन शिंदे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांना दिले आहे.
कडेगाव नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १७मधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष व टाळाटाळ करत आहेत. येथील डॉ. रेणुशे हॉस्पिटलपासून युवराज राजपूत यांचे घरमार्गे वडतुकाई मंदिरापर्यंत गटार व रस्ता कामासाठी २० लाखांचा निधी मंजूर आहे. हा रस्ता प्रभाग क्रमांक १६ व १७च्या मध्यातून जातो. शासन नियमानुसार या संपूर्ण रस्त्याचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागाला देणे गरजेचे होते. परंतु, रेणुशे हॉस्पिटल ते युवराज राजपूत घरमार्गे शंभूराजे चौकापर्यंत मोजमापे दिलेली आहेत व राहिलेल्या मोजमापात प्रभाग क्रमांक १६ मधील गटाराचे काम धरले आहे. या गटाराचे पाणी लघु पाटबंधारे विभागाच्या कालव्यामध्ये जाणार आहे.
या चुकीच्या कामाची माहिती मिळताच नगरसेवक नितीन शिंदे यांनी मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. शासनाच्या नियमानुसार मंजूर असलेले संपूर्ण काम पूर्ण करावे, अशी त्यांची मागणी आहे. परंतु, प्रभाग क्रमांक १७मधून भाजपचा नगरसेवक निवडून आलेला असल्यामुळे येथील कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय स्वच्छता कामाचा ठेका, घंटागाडी तसेच स्वच्छ भारत अभियान कामातील नगर पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार नितीन शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शासन मान्यतेप्रमाणे रेणुशे हॉस्पिटल ते वडतुकाई मंदिर रस्ता २६ जुलै २०२१पर्यंत मंजूर व्हावा अन्यथा २८ जुलै रोजी कडेगाव नगर पंचायतीविरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
फोटो : कडेगाव नगर पंचायत इमारतीचा फोटो वापरावा.