शिराळा : ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत रुग्णांना तातडीने सेवा मिळत आहे. मात्र या सेवेच्या ‘खासगी रुग्णालयांच्या कनेक्शन’बाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यावर, संबंधित सेवा देणाऱ्या संस्थेने शासकीय रुग्णालयामार्फतचे रुग्ण शासकीय रुग्णालयातच दाखल करावेत, तसेच काही खासगी रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण ठराविकच रुग्णालयात रुग्ण हलवू नयेत, अशा सक्त सूचना तातडीने दिल्या आहेत. ‘१०८’ क्रमांक डायल केल्यावर बी. व्ही. टी. या कंपनीद्वारे काही वेळातच रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी हजर होते. ही सेवा सुरू झाल्यापासून अनेक रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे काहींचे प्राणही वाचले आहेत. त्यामुळे ही चांगली सेवा असल्याचे दिसून आले. मात्र शासकीय रुग्णालयातील अथवा खासगी रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेले रुग्ण ठराविक रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न या सेवेमार्फत चालू झाला. त्यामुळे सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक सुरू झाली. साहजिकच याबाबत तक्रारी वाढल्या. आ. शिवाजीराव नाईक यांच्याकडे याबाबत तक्रारी आल्यावर त्यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘लोकमत’ने या घटनेबाबत आवाज उठविल्यावर आरोग्य विभागाने तातडीने याची चौकशी सुरू केली. संबंधित कंपनीनेही खासगी रुग्णालयांबरोबरचे आर्थिक कनेक्शन बंद व्हावे, यासाठी शासकीय रुग्णालयातून पाठविण्यात आलेले रुग्ण शासकीय रुग्णालयातच पाठविण्यात यावेत, तसेच काही उपचारांसाठीचे रुग्ण खासगी रुग्णालयातून ठराविक रुग्णालयात दाखल करू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)रुग्णांना मोफत व वेळेत सेवा मिळावी, यासाठी शासकीय रुग्णालयाकडून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयातच रुग्ण पाठविण्यात यावेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयातून ठराविकच खासगी रुग्णालयात रुग्ण पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत.- डॉ. वेदांत मोरे, रुग्णसेवा अधिकारी
खासगी रुग्णालयाच्या ‘१०८’ कनेक्शनला चाप
By admin | Published: October 27, 2015 11:22 PM