बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) परिसराला सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. सलग दोन तास झालेल्या पावसात मका पिकाचे व आंबा फळपिकाचे मोठे नुकसान झाले.
बुधवारी दिवसभर शिराळा तालुक्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास शिराळा पश्चिम विभागात अचानक ढग जमा झाले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या दरम्यान अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली तर आंबा पिकाचे माेठे नुकसान झाले. मका पिकाची काढणी शिवारात सुरू असून, अनेकांच्या मक्याचे भिजल्यामुळे नुकसान झाले. या पावसामुळे खरीप पिकाच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. परंतु, सध्या शेतामध्ये पाणी साठून इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.