सांगली : आरफळ, टेंभू उपसा सिंचन योजनेतून दहा दिवसांत पलूस तालुक्यातील गावांना पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात येईल. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.बांबवडे, मोराळे, आंधळी, सांडगेवाडी परिसराला पाणी मिळत नसल्यामुळे तेथील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगलीतील वारणाली येथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय पाटील, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठल्यामुळे रब्बीची गहू, हरभरा, ज्वारी, मका, द्राक्षबागा वाळू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बांबवडे, मोराळे, आंधळी, सांडगेवाडीतील शेतकऱ्यांना आरफळ, टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता पाटाेळे यांनी येत्या दहा दिवसांत आरफळ योजनेचे पाणी पलूस वितरिकामध्ये पाणी सोडण्यात येईल. तसेच टेंभू योजनेचे अपूर्ण कामही तातडीने पूर्ण करून पाणी देण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना त्यांनी दिले.यावेळी बांबवडेचे विक्रम संकपाळ, दादासाहेब पवार, पांडुरंग संकपाळ, आंधळीचे मानसिंग जाधव, मोराळेचे बाळासाहेब पाटील, जनार्दन पाटील, सांडगेवाडीचे सुनील सूर्यवंशी, अरुण शिंदे, लालासाहेब पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टेंभू योजनेतून पाणी द्यातारळी धरणातून आरफळ योजनेस जोडणारी ७० मीटर अपूर्ण पाइपलाइनचे काम तत्काळ पूर्ण करण्याची गरज आहे. तांत्रिक अडचणी असल्यास तारळी धरणातील पाणी कृष्णा नदीमध्ये सोडून टेंभू योजनेच्या उपसा सिंचन पंपाद्वारे आरफळ योजनेच्या पलूस वितरिकेमध्ये सोडण्याची गरज आहे. ‘जलसंपदा’च्या या निर्णयामुळे पलूस तालुक्यातील आठ गावांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असेही शेतकऱ्यांनी ‘जलसंपदा’च्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली.