दत्ता पाटीलतासगाव : लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधकांनीच पराभवासाठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांची खासदारकीच्या हॅट्ट्रिकची संधी हुकली. ही सल ताजी असतानाच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. संजय पाटील यांच्या मनात चाललंय तरी काय? हा प्रश्न चर्चेत आहे. आगामी विधानसभेला पक्षांतर्गत विरोधकांना खिंडीत गाठण्याचा डाव की नव्या राजकीय इनिंगची तयारी, याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपचे जत तालुक्याचे नेते विलासराव जगताप, जुने सहकारी अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांच्याविरोधात उघड बंड पुकारले. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही छुपा अजेंडा राबवला. त्यांच्यावर कारवाईचा अहवालदेखील सादर करण्याची घोषणा जिल्हाध्यक्षांनी केली होती. मात्र पक्षश्रेष्ठींकडून ना जगतापांचा राजीनामा स्वीकारण्यात आला, ना देशमुखांवर कारवाई झाली. इतकेच नव्हे तर भाजपमधील अन्य काही बड्या नेत्यांनीही संजय पाटील यांच्याविरोधात छुपा अजेंडा राबविला. निवडणुकीच्या निकालानंतर ताे चव्हाट्यावर आला.संजय पाटील यांची एकंदरीत राजकीय वाटचाल पाहता त्यांनी वेळोवेळी राजकीय बंड केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. ते पुन्हा एकदा राजकीय बंड करणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. खासदारकीच्या दहा वर्षांच्या काळात संजय पाटील यांनी जिल्हाभरात स्वतःचा गट तयार केला. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात पाटील यांचे उपद्रवमूल्य आहे. अंतर्गत विरोध करणाऱ्या नेत्यांना खिंडीत गाठण्याची पाटील यांना ही संधी आहे. ही संधी साधून स्वतःचे उपद्रवमूल्य सिद्ध करणार की नवी राजकीय इनिंग सुरू करणार? याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.भेट शरद पवारांची; चर्चा जयंत पाटलांच्या संबंधांचीमाजी खासदार पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी असलेल्या संबंधांची चर्चा होत आहे. दाेघांचे सलोख्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. याच संबंधातून संजय पाटील राष्ट्रवादीशी जवळीक साधतील, असे बोलले जात आहे.
भाजपमध्ये कोंडीमहायुतीच्या जागावाटपात तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमध्ये होणारी कोंडी फोडण्यासाठी नव्या राजकीय इनिंगची चर्चा सुरू झाली आहे.