विकास शहाशिराळा : ‘नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनाला’ असा जप करत भल्या सकाळी शिराळा आगारात महिलांचा एक मोठा गट जमला. ‘एसटी संगे तीर्थाटन’ या योजनेतून बुकिंग केलेल्या महिलांना अकरा मारुतींच्या दर्शनाला जायचे होते. मात्र, एसटी अधिकारी व चालकांत अचानक वाद टोकाला गेला. तो संपता संपेना. तीन तास भाविक महिला ताटकळत थांबल्या होत्या. अखेर पाच अन्य चालक नियुक्त केल्यानंतर विलंबाने त्यांच्या तीर्थाटनाचा नारळ फुटला.सध्या एसटीची ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ ही योजना सुरू आहे. त्यातूनच तालुक्यातील अंत्री, मानकरवाडी, शिराळा, भाटशिरगाव, कार्वे याठिकाणच्या महिलांनी अकरा मारुती दर्शनासाठी बसेस ठरवल्या होत्या. सकाळी ६ वाजता प्रवाशांना घेऊन आगारातून पाच बसेस जाणार होत्या. महिला ६ वाजल्यापासून बसची वाट पाहात बसल्या होत्या. चालक कम वाहक असणाऱ्यांची ड्युटी या पाचही गाड्यांवर लावण्यात आली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांनी वाहक बरोबर असल्याशिवाय गाड्या नेणार नाही, असा पवित्रा घेतला. अधिकाऱ्यांनी चालक कम वाहक अशी ड्युटी असल्याने गाड्या घेऊन जाव्या लागतील, असे बजावले.
हा वाद सुरू झाल्यावर आगार प्रमुख धन्वंतरी ताटे, जयंत पाटील आदी अधिकारी त्याठिकाणी आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना ड्युटीवर जाण्यास सांगितले. मात्र, वाहक असल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. जर गाडी मागे-पुढे घेताना अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल चालकांनी उपस्थित केला. हा वाद तीन तास सुरू होता. अखेर नियुक्त चालकांच्या ऐवजी दुसऱ्या चालकांना पाठवल्यानंतर तीर्थाटनाला सुरूवात झाली. मात्र, यामुळे तीन ते साडेतीन तास महिलांना ताटकळत बसावे लागले.
रोटेशन पद्धत कुठे गेलीनिलंबित चालकांनी सांगितले की, आम्ही वाहक दिल्याशिवाय गाड्या नेणार नसल्याचे सांगितले होते. या मार्गावर गर्दी असते. त्यामुळे गाडी मागे-पुढे घेताना अपघात होऊ शकतो. तसेच सहा वर्षांपासून ड्युटी लावण्याची रोटेशन पद्धत या आगारात अमलात आलेली नाही.
विशेष गाड्या असल्याने चालक कम वाहक असणाऱ्यांची ड्युटी निश्चित केली होती. यापूर्वी या कर्मचाऱ्यांनी याच मार्गावर गाड्या नेल्या होत्या. सध्या गाड्यांच्या तुलनेत कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे नियोजन करताना कसरत होते. प्रवाशांना विलंब झाल्याने या पाचही चालकांवर कारवाई करण्यात येईल. - धन्वंतरी ताटे, आगार प्रमुख, शिराळा