सांगली : आठवडा बाजाराचाच एक भाग असलेला कापड बाजार हटविल्यानंतर शनिवारी सांगलीत महापालिका अधिकारी व विक्रेत्यांत जोरदार वादावादी झाली. पोलिसांची मध्यस्थीही कामी आली नाही. शेवटी रस्त्यावरच विक्रेत्यांनी ठाण मांडले. दिवसभर हा वाद सुरु होता. यावेळी महापालिकेच्या अग्निशमन गाडीच्या काचा अज्ञाताने दगडफेक करुन फोडल्या. त्यामुळे तणावात भर पडली.सांगलीचा शनिवारचा बाजार भारती विद्यापीठाच्या इमारतीपासून कापडपेठेत भरतो. मित्रमंडळ चौकात कपड्यांचा बाजारात भरतो. दरवर्षी दिवाळीत याठिकाणी कापड विक्रेते रस्त्यावर बाजार मांडतात. नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी हा बाजार भरविला. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने हा बाजार हटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर विक्रेते आक्रमक झाले. कर्मचारी व त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. महापालिकेच्या निर्णयाची माहिती दिली. आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व बाजार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भरविण्याचा निर्णय घेतल्याने विक्रेत्यांनी नियुक्त जागेत जावे, अशी सुचना दिली. मात्र, विक्रेत्यांना हा पर्याय मान्य झाला नाही. त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
सांगली शहर पोलिसांनीही विक्रेत्यांशी चर्चा करुन मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र तोही यशस्वी झाला नाही. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी या विक्रेत्यांना सायंकाळी पाच वाजता स्टेशन चौकातील मोकळ्या जागेत बसण्याची सूचना दिली. विक्रेत्यांनी त्याठिकाणी बाजार मांडण्यास सुरुवात केल्यानंतर पुन्हा महापालिकेच्या पथकाने त्यांना हटविण्याचा प्रयत्न केल्यावर वादावादी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत या बाजाराच्या स्थलांतराचा प्रश्न सुटला नाही. विक्रेत्यांनी महापालिकेविरोधात निदर्शने केली. यावेळी वसीम शेख, प्रवीण इनामदार, तौफिक मुतवल्ली, सद्दाम पठाण, सैफ अली आदी १५० विक्रेते उपस्थित होते.
महापालिकेच्या वाहनावर दगडफेकमहापालिकेच्या अग्निशमन गाडीवर आंदोलनावेळीच अज्ञातांनी दगडफेक केली. यात वाहनाच्या काचा फुटल्या. विक्रेत्यांपैकी कुणीतरी दगडफेक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र विक्रेत्यांनी महापालिकेचा तो आरोप फेटाळला. काटकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.