सांगली : महापालिकेचा सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार धूमचक्री झाली. अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अंगावर जयंत पाटील गटाचे नगरसेवक धावले. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी सभागृहातच कमरेचा पट्टा काढून थोराताना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. भाजप व काँग्रेसचे नगरसेवकांनी दोन्ही गटाला अडवल्याने मोठा अनर्थ टाळला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दोघांना सभागृहामध्ये काढले. महापालिकेची सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मिरजेतील अजितदादा गटाचे योगेंद्र थोरात व जयंतराव गटाचे गटाच्या संगीता हारगे यांच्या वार्डातील विकास कामावरून धुसफूस सुरू आहे. या वादाचे रूपांतर शुक्रवारी हाणामारी पर्यंत पोहोचले. सभेत संगीता हारगे यांनी मिरजेतील खाजा वसाहत रस्त्याचा प्रश्न मांडला या रस्त्याचे भूसंपादन झाले नसताना निविदा कशी काढण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला. यावर थोरात यांनी खुलासा करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा प्रशासनावर दबाव असल्यास आरोप केला. जयंतरावावर आरोप होताच गटनेते मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, विष्णू माने शेडजी मोहिते संगीता हरगे आक्रमक झाल्या. महापौरांच्या आसनासमोर जात थोरातांनी माफी मागावी, अशी मागणी केली. यातून वाद वाढत गेला. जयंतराव गटाचे नगरसेवक थोरात यांच्या अंगावर धावून गेले. बागवान यांनी कमरेचा पट्टा काढत थोरातांना मारण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस व भाजपचे नगरसेवक धावून आले. त्यांनी जयंतरावांच्या गटातील नगरसेवकांना बाजूला केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही माफी मागण्याचे आदेश दिले. तसेच हारगे व थोरात या दोघांनाही सभागृहातून निलंबित केले. दोघांनाही सभागृह सोडल्यानंतर पुढील कामकाजाला सुरुवात झाली.
सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धुमश्चक्री, पट्टा घेऊन अंगावर धावले
By शीतल पाटील | Published: August 04, 2023 6:06 PM