जत : देवीच्या वर्गणीचे पैसे मागितल्याचा कारणावरून जत तालुक्यातील उमराणी येथे दोघांनी संदीप गणपती बजंत्री (वय २७ वर्षे, रा. उमराणी, ता. जत) याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. मात्र या घटनेची नोंद मध्यरात्री जत पोलिस ठाण्यात झाली.याप्रकरणी संशयित विशाल ऊर्फ विश्वनाथ सिद्राया कैकाडी (बजंत्री) व रवींद्र ऊर्फ कुमार सिद्राया कैकाडी (बजंत्री) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जत तालुक्यातील उमराणी येथे कैकाडी गल्लीत समाज मंदिर आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत संदीपचे आजोबा सदाशिव मारुती बजंत्री (वय ७०) यांनी संशयितांना यात्रेतील शिल्लक वर्गणीचा हिशेब मागितला. संशयितांना याचा राग आल्याने त्यांनी सदाशिव यांना शिवीगाळ केली. मृत संदीपने याबाबत संशयितांना जाब विचारला. त्यानंतर संशयित व संदीप यांच्यात बाचाबाची झाली. संशयित रवींद्र याने दगडाने संदीपच्या डोक्यावर हल्ला केला. डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात आजोबा सदाशिव मारुती बजंत्री यांनी फिर्याद दिली आहे.खुनाच्या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. खून करून दोघे आरोपी कर्नाटकात पळून गेले. त्यांचा जत पोलिस ठाण्यातील दोन पथकाद्वारे शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव हे करीत आहेत.
Sangli: यात्रेच्या वर्गणीवरून वाद, उमराणीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; संशयितांचे कर्नाटकात पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 6:50 PM