हुतात्मा किसन अहिर व नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षणसंस्था सांगलीचे अध्यक्ष प्राचार्य आर.एस. चोपडे, व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डाॅ. बाबूराव गुरव, हुतात्माचे वैभव नायकवडी, हुतात्मा साखर कारखाना उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : भारतात सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात सशस्र उठाव वाळवा तालुक्यात झाला. १९४२चा क्रांती लढा हा एक वेगळाच आंदोलनाचा भाग होता, असे प्रतिपादन प्राचार्य आर.एस. चोपडे यांनी केले.
वाळवा येथे हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूह, शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, धरणग्रस्त व पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने आयोजित हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृती सभा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, बाबूराव बोरगावकर उपस्थित होते.
चोपडे म्हणाले, हुतात्मा म्हटले की, माणसाच्या मनात चैतन्य निर्माण व्हायचे असाच तो काळ होता. डाॅ. नागनाथ अण्णांच्यात कृतज्ञता ठासून भरली होती. त्यामुळेच त्यांनी हुतात्मा किसन अहिर विद्यालय, साखर कारखाना, हुतात्मा नानकसिंग विद्यालय सोनवडे, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय ही जिवंत स्मारके उभी केली आहेत. नागनाथ अण्णांच्या निस्पृहपणामुळे हुतात्म्याचे नाव संपूर्ण भारतभर होत आहे.
बाबूराव गुरव म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी कामगारांसाठी चार कायदे आणले आहेत. यामुळे कामगारांना १२ ते १५ तास काम करावे लागणार आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या कल्याणाचे आहेत. हे तीन कृषी कायदे हानून नाही पाडले तर पाच वर्षांनी उसाला दर एफआरपीप्रमाणे मिळणार नाही.
वैभव नायकवडी यांचे भाषण झाले. शिराळा पंचायत समितीचे उपसभापती प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी हुतात्मा किसन अहिर, हुतात्मा नानकसिंग व डाॅ.नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सागर चिखले यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य डाॅ. सुषमा नायकवडी, मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, मुख्याध्यापिका व्ही.के. चेंडके, मुख्याध्यापक बाळासाहेब नायकवडी, महादेव कांबळे, पोपट फाटक, अभियंता व्ही.डी. वाजे, बाळासाहेब पाटील, भगवान पाटील, दिनकर बाबर, यशवंत बाबर, धीरजकुमार माने उपस्थित होते.