सांगली : पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. याशिवाय लष्करी जवानांच्या एका पथकासह त्यांचे वैद्यकीय सहाय्यता केंद्रही शहरात सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी रविवारी या मदतकार्याचा आढावा घेत पथकांना सूचना दिल्या.
गुरुवारी पाणीपातळी इशारा पातळी ओलांडण्याअगाेदरच प्रशासनाकडून एनडीआरएफ, पथकाची मागणी केली होती. त्यानुसार सुरुवातीला दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली. वाळवा तालुक्यात व सांगली शहरात हे पथक सध्या मदतकार्यात व्यस्त आहे.
लष्कराचे एक पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, ते पलूस तालुक्यात आणि सांगली शहरात कार्यरत आहे. या लष्करी पथकाकडून शहरात दोन ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करून नागरिकांना मदत केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कायम असलेल्या महापूर स्थितीमुळे प्रशासनाने आणखी दोन एनडीआरएफच्या पथकाची मागणी केली असून, सोमवारपर्यंत ती पथके दाखल होण्याची शक्यता आहे. त्यातील एक पथक कोल्हापुरात असले तरी रस्ते बंद असल्याने ते तिथेच अडकल्याने तेही पथक लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे.