सांगली लोकसभेचे सैन्य तयार, सेनापती अनिश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:34 AM2019-03-13T02:34:05+5:302019-03-13T02:34:26+5:30
कार्यकर्त्यांत संभ्रम; भाजपा, कॉँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ कायम
सांगली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सांगली मतदारसंघात कॉँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षातील सैन्यदल सज्ज झाले असले तरी, सेनापती निश्चित नसल्याने गोंधळ वाढला आहे. गेली महिनाभर बूथ कमिट्यांसह पक्षांतर्गत प्रचाराच्या अनेक नियोजन बैठका झाल्या असल्या तरी, निवडणूक जाहीर होऊनही पक्षीय कार्यालने शांतच आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपा व कॉँगे्रस या दोन्ही पक्षांची अस्तित्वाची लढाई यंदा रंगणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला गत निवडणुकीत भाजपाच्या हल्ल्यात ढासळला असला तरी, कॉँग्रेस हा गड पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. सक्षम उमेदवाराअभावी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून गेली महिनाभर गोंधळ सुरू असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतरही तो कायम आहे. दुसरीकडे भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांची भाजपाचा उमेदवार म्हणून दावेदारी मजबूत मानली जात असली तरी, पक्षाकडून त्यांच्याही उमेदवारीला अद्याप हिरवा कंदील दर्शविला गेलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात वातावरण शांत आहे. सांगलीच्या कॉँग्रेस भवनात तसेच खासदारांचे काका भवन अद्याप शांतच आहे.
एकमेकांवर नजरा
कॉँग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. विरोधी पक्षातील हालचालींचा अंदाज घेऊन रणनीती आखण्याची तयारी करण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपा व कॉँग्रेसच्या नेत्यांनी यासाठी काही कार्यकर्त्यांची नेमणूकही केली आहे.