ओळी : शहरातील पावसाळी पाणी साचलेल्या परिसराची महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून राहते. त्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी ड्रेनेज व आरोग्य विभागाला दिले.
महापौर सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी मारुती चौक, स्टेशन चौकासह प्रभाग १२, १४ व १६मध्ये पावसाचे पाणी साचलेल्या परिसराची पाहणी केली. सूर्यवंशी म्हणाले की, गुरुवारी झालेल्या पावसाने कापडपेठ, मेन रोड, मारुती चौक, हरभट रोड या परिसरात पाणी साचले होते. मारुती चौकात ड्रेनेज चेंबरवर डिजिटल फलक टाकून तो बंद करण्यात आला होता. हा फलक काढताच पंधरा मिनिटात पाण्याचा निचरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती पाणी साचते. त्याठिकाणी क्राॅस पाईप तातडीने बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय आवश्यक त्या सर्वच ठिकाणी क्राॅस पाईप टाकून पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन करण्याची सूचनाही केली आहे.
यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, निरीक्षक प्रणील माने, धनजंय कांबळे, ड्रेनेज अभियंता कमील धावडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.